ठाणे, 15 जनवरी - राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मुंबईतही सकाळीच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. “मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी, भविष्यातील सोयी-सुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले. कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीने नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“कोणतेही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा, यासाठी आयोग दक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे,” असे आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
